१५ ऑगस्टपासून एसटी चालक-वाहक आमरण उपोषणाचा इशारा; सणासुदीत प्रवाशांना फटका बसण्याची शक्यता
धाराशिव – राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक कण्याचा आधार असलेले चालक आणि वाहक यांनी त्यांच्या आगारस्तरील प्रलंबित मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला असून, येत्या 15 ऑगस्टपासून आमरण उपोषणाला सुरुवात करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनामुळे श्रावण महिना आणि आगामी सणासुदीच्या काळात एसटी सेवेत मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.
या मागण्यांसाठी चालक-वाहकांनी आगार व्यवस्थापकांना निवेदन दिले असून, त्याची प्रत परिवहन मंत्री, धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री, विभाग नियंत्रक, विभागीय वाहतूक अधिकारी, कामगार अधिकारी, पोलीस निरीक्षक (आनंदनगर), तसेच विभागीय सुरक्षा व दक्षता अधिकारी यांना पाठवली आहे.
प्रमुख मागण्यांमध्ये –
-
नियमानुसार आपत्कालीन भत्ता देणे
-
सेवा जेष्ठतेनुसार कर्तव्याचे वाटप
-
जेष्ठतेनुसार रोटेशन तालिका तयार करणे
-
मुंबई, बोरीवली, भिवंडी पायलट कर्तव्याचा संपूर्ण मोबदला देणे किंवा इतर आगारांप्रमाणे ‘स्क्रू’ सुविधा उपलब्ध करणे
याशिवाय आणखी काही स्थानिक आणि सेवा-संबंधी मागण्या देखील निवेदनात नमूद केल्या आहेत. कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले की, जर या मागण्यांवर तातडीने अंमलबजावणी झाली नाही तर 15 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू केले जाईल.
या निवेदनावर वाहक ए. डी. शिरसकर, चालक एल. बी. सय्यद, वाहक के. बी. गायकवाड, चालक व्हि. टी. मुंडे, चालक एन. व्ही. रपकाळ, चालक जी. के. कात्रे, वाहक सौ. एम. एस. राऊत यांच्यासह एकूण 53 चालक-वाहकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. पुढील काही दिवसांत आणखी कर्मचारी या आंदोलनात सामील होण्याची शक्यता आहे.
एसटीचे चालक आणि वाहक हे प्रवासी वाहतुकीचे मुख्य घटक असल्याने, त्यांचा संप थेट गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम करेल. त्यामुळे, उपोषण प्रत्यक्षात झाल्यास सणासुदीच्या काळात प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
0 Response to "१५ ऑगस्टपासून एसटी चालक-वाहक आमरण उपोषणाचा इशारा; सणासुदीत प्रवाशांना फटका बसण्याची शक्यता"
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubt please let me know...!