“तुळजापूरात श्री काळभैरवनाथाचा भेंडोळी उत्सव — भक्ती, इतिहास आणि परंपरेचा दिव्य संगम”
तुळजापूर (अमोल बासुतकर प्रतिनिधी):
तीर्थक्षेत्र तुळजापूर नगरीत सोमवारी (20 ऑक्टोबर 2025) सायंकाळी दीपावलीतील नरक चतुर्दशी व दर्श अमावस्येचा शुभ मुहूर्त साधून श्री काळभैरवनाथाचा भेंडोळी उत्सव पार पडणार आहे. या प्रसंगी तुळजापूर नगरीत भक्ती, परंपरा आणि आध्यात्मिकतेचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे. काशीपश्चात तुळजापुरात साजरा होणारा हा भेंडोळी उत्सव प्राचीन इतिहासाची झालर लाभलेला असून, या सोहळ्याला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
श्री तुळजाभवानी मातेच्या उजव्या बाजूला उंच कड्यावर वसलेले श्री काळभैरवाचे प्राचीन मंदिर हे या उत्सवाचे केंद्रबिंदू आहे. काळभैरवाला नगराचा आद्य नागरिक अष्टभैरवांमध्ये या मंदिरातील काळभैरवाला विशेष मानाचे स्थान आहे. तुळजाभवानी मातेच्या मंदिराशी याचा अतूट संबंध असल्याचे अनेक दाखले पौराणिक कथांमधून समोर येतात.
दंतकथेप्रमाणे, जेव्हा विश्वजननी श्री तुळजाभवानी माता पृथ्वीभ्रमण करत तुळजापूर नगरीत आली, तेव्हा तिच्या वास्तव्याकरिता योग्य स्थान शोधण्याचे कार्य मातेने काळभैरवावर सोपवले. काळभैरवाने स्वतः जागा शोधून तिथेच वास्तव्य केले आणि मातेच्या आज्ञेचा विसर पडला. त्यामुळे मातेचा राग अनावर झाला आणि तिने काळभैरवाच्या श्रीमुखात भडकावली, अशी आख्यायिका आजही तुळजापूरच्या लोककथांमध्ये जिवंत आहे.
अनादी काळापासून काळभैरवाच्या कड्यावर ‘भेंडोळी’ प्रज्वलित करून ती मातेच्या मंदिरात आणण्याची परंपरा येथे सुरू आहे. शेकडो पुजारी बांधव पेटलेली भेंडोळी खांद्यावर घेत मंदिरात दाखल होतात. भेंडोळीला प्रदक्षिणा घालून ती श्री तुळजाभवानी मातेच्या सिंहासनाला भिडविण्याची प्रथा शेकडो वर्षांपासून अखंडितपणे चालू आहे. या पवित्र क्षणी मंदिर परिसर ‘जय भवानी, जय काळभैरव’च्या घोषणांनी दुमदुमतो आणि वातावरणात भक्तीचा सागर उसळतो.
या अनोख्या सोहळ्यामुळे तुळजापूर तीर्थक्षेत्राला काशीचे पुण्य आणि महत्त्व लाभलेले मानले जाते. देशात काशीनंतर केवळ तुळजापुरातच भेंडोळी उत्सव साजरा होतो, ही या नगरीची अनोखी धार्मिक ओळख आहे.
उत्सवाच्या दिवशी सायंकाळी काळभैरव मंदिर परिसरात भक्तांची प्रचंड गर्दी अपेक्षित आहे. नगरातील विविध मंडळांकडून पारंपरिक संबळ वाद्यांसह भव्य मिरवणुका काढल्या जातील. मंदिराचा परिसर दीपांनी उजळून निघणार असून प्रशासन आणि मंदिर समितीकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
देवीचे महत्व:
तुळजाभवानी देवीच्या मंदिरात अश्विन अमावस्येला भेंडोळी उत्सव साजरा केला जातो. काळभैरवनाथ हा देवीचा रखवालदार आहे आणि त्याच फिरणं रात्रीचं असतं त्याला उजेड हवा म्हणून हा भेंडोळी उत्सव असल्याची अशी आख्यायिका आहे. काळभैरवनाथ ला काशीचा कोतवाल म्हटलं जाते. त्याची मंदिरे भारतात सर्वत्र असली तरी भेंडोळी उत्सव उत्तरेत काशी आणि दक्षिणेत तुळजापूर येथेच फक्त साजरा होतो. भेंडोळी प्रज्वलनानंतर कालभैरव मंदिरापासून श्रीतुळजाभवानी देवीच्या मंदिरात आणली जाते. नंतर देवीला पदस्पर्श करून मंदिराला प्रदक्षिणा करून वेशीबाहेर आणून भेंडोळी विझवली जाते.
भेंडोळी म्हणजे एका अकरा फूट लांब व साधारण सात ते आठ इंच जाडीच्या काठीला (दांड) मधोमध कच्च्या केळीचा अखंड घड बांधला जातो. नंतर संपूर्ण दांडावर केळीच्या खोडाचे जे साल गुंडाळतात नंतर चिंचेच्या झाडाच्या छोट्या छोट्या फांद्यांचा एक थर संपूर्ण दांडावर लावला जातो. यावर आंबड्याच्या झाडाची साल व पीळ घातलेल्या दोरीचा वापर करून सर्व बांधणी झाल्यानंतर एका लोखंडी साखळदंडामध्ये सुती कपड्याचे पलिते तेलामध्ये बुडवून ओवले जातात व ते प्रज्वलीत केले जातात.
एकूणच, तुळजापूरातील श्री काळभैरवनाथाचा भेंडोळी उत्सव हा केवळ धार्मिक विधी नसून—तीर्थक्षेत्राच्या आत्म्याचा उत्सव आहे, जो श्रद्धा, शौर्य आणि भक्तीच्या जाज्वल्य परंपरेचे प्रतीक म्हणून दरवर्षी उजळतो.
0 Response to "“तुळजापूरात श्री काळभैरवनाथाचा भेंडोळी उत्सव — भक्ती, इतिहास आणि परंपरेचा दिव्य संगम”"
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubt please let me know...!